ठाणे: भटक्या विमुक्त जातींना गरिबी, कमी शिक्षण आणि इतर अनावश्यक बाबींमुळे संकटाला सामोरे जावे लागते. त्यातून मुक्ती मिळून त्यांना नवीन ओळख देण्याची व आत्मसन्मान वाढवण्यासाठी गोधडी शिवून त्यामार्फत रोजगार व्यवसाय उभारला जात आहे. यातूनच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काही महिला गट प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदयाच्या 200 महिलांनी व्यवसायात सहभाग नोंदवला आहे. गोधडी शिवण हे पारंपरिक पद्धतीच काम आहे. त्याचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
नवी मुंबई येथील साठेनगर, पटणी महावीर क्वारी आणि गणपती पाडा येथे महिला सक्षमीकरणासाठी गोधडी व्यवसायाची सुरुवात करण्यात आली आहे. यातील महिला प्रामुख्याने भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदाय यातील आहे. या व्यवसायासाठी रोटरी क्लबच्या नम्रता श्रीवास्तव यांनी पुढाकार घेतला. एका सामुदायिक व्यवसायाची सुरुवात रोटरी क्लब ग्लोबल ग्रँट या प्रकल्पाअंतर्गत झाली आहे.
टाटा प्रोडक्टचे समन्वयक डॉ.जोगेंद्र घोरपडे म्हणाले, की प्रत्येक महिला दिवसाचे २-३ तास गोधडी शिवण्यासाठी घालवितात. तसेच आपल्या कुटुंबाची कामे करतात. यातूनच महिन्याला उत्पन्न मिळवित आहेत. 2011 पासुन संपूर्ण राज्यात भटक्या विमुक्त समाजासाठी काम केली जात आहेत. मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून मुलांचे शिक्षण आणि आरोग्य लक्षात घेता या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिक्षण आणि आरोग्याबरोबरच महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेता महिलांनी स्वतः कमवून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.