ठाणे - मुंबई एमएमआर विभागामध्ये महिलांना लोकल प्रवासाला मुभा मिळाल्याने कामकाजासाठी जाणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर महिला प्रवासासाठी बाहेर पडल्या. मात्र, अपुऱ्या तिकीट खिडक्यांमुळे डोंबिवली, दिवा स्थानकांतील तिकीट घरांमध्ये सकाळी ११ च्या सुमारास लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, सुरक्षित अंतराचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले.
अनेक महिलांनी बुधवारी पहिल्या दिवशी प्रवास टाळला होता. गुरुवारी आणि शुक्रवारी त्या घराबाहेर पडल्याने डोंबिवली पश्चिमेला तिकिटाची रांग रेल्वे स्थानकात थेट महात्मा गांधी रस्त्यावर पोहोचली होती. दिवा रेल्वे स्थानकात तर महिलांच्या रांगा तिकीट घरांमधून रस्त्यावर आल्या होत्या. तिकीट खिडक्या पुरेशा प्रमाणात उघड्या नाहीत. स्थानकातील एटीव्हीएम सुविधा बंद असल्याने महिला ताटकळत उभ्या असल्याचे आढळले. जशी वेळ वाढली तशी गर्दीही वाढल्याने महिला त्रस्त झाल्या.
जास्तीच्या खिडक्या तातडीने सुरू करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. दुपारी १२ नंतर विशेष तिकीट खिडक्या सुरू झाल्यानंतर गर्दी आटोक्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनेच्या मागणीची दखल घेत विशेष खिडक्या सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी रेल्वेचे आभार मानले.