ठाणे - मांत्रिकाने सांगितले तुमच्या सुनेला मूल होणार नाही. म्हणून मांत्रिकाच्या सांगण्यावरून सासरच्यांनी विवाहितेला बेदम मारहाण करीत तिला घरातून हाकलून दिल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील देवरुंग पाडा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सासरच्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या विवाहितेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धक्कादायक..! मांत्रिकाच्या सांगण्यावरून विवाहितेला बेदम मारहाण करीत घरातून काढले
मात्रिकाच्या सांगण्यावरून एका विवाहितेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सुनेला मूल होणार नाही, असे एका मांत्रिकाने सांगितल्याने सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ सुरू केला आहे.
अंबरनाथ तालुक्यात माहेर असलेल्या या घटनेतील पीडितेचा १५ जून २०२० ला भिवंडी देवरुंग पाडा येथील देवेश पाटील याच्या सोबत लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या १५ दिवसानंतर लगेच पतीचे मामा ,मामी आणि नवऱ्याने तिचा छळ सुरू केला. सासरच्यांना एका मांत्रिकाने पीडितेला मूल होणार नाही, असे सांगितल्याने त्यांनी पीडितेचा छळ सुरू केला. तसेच २४ नोव्हेंबरच्या रात्री एका चारचाकी गाडीत बसवून बेदम मारहाण करीत तिच्या माहेराच्या घरासमोर फेकून दिले, असल्याची माहिती पीडितेने स्वत: दिली आहे.
अशा प्रकारे इतका अमानुष छळ करणाऱ्या सगळ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडितेने केली आहे, या प्रकरणी सुरुवातीला टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी सासारच्यांच्या विरोधात भादवी कलम ४९८ अ , मारहाण, धमकवणे या कलमानुसार भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र पोलिसांनी पीडितेने सांगितल्याप्रमाणे जवाब नोंद केला नाही, असा आरोप तिच्या भावाने केला आहे.
पीडित विवाहितेचा पोलीस घेणार पुन्हा जवाब ..
या प्रकरणात सासरीच्या मंडळींना वाचवण्याचा प्रयत्न होत असून आम्हाला जीवे ठार मारण्याचा धमक्या दिल्या जात असल्याचे पीडितेच्या भावाने सांगितले. तर पीडित अजून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांचा जवाब घेऊन सखोल तपास करून पुढची कारवाई करू, असे पडघा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी सांगितले. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देऊ असे त्यांनी सांगितले.