ठाणे - एक महिला प्रसूतीसाठी खडवली रेल्वे स्थानकावरून मुंबईतील कामा रूग्णालयाकडे जात असताना तिच्या पोटात कळा उठू लागल्या. वेदना असह्य झाल्याने रेल्वे पोलिसांनी तिला डोंबिवली रेल्वे स्थानकावरील फलाटावर उतरवून प्रसूती करण्याचा निर्णय घेतला व तिथेच तिने एका बाळाला जन्म दिला. जास्मिन शब्बीर शेख (29) असे बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव आहे.
महिलेने रेल्वे फलाटावरच दिला गोंडस बाळाला जन्म; डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना - जास्मिन शेख
जास्मिन शेख ही प्रसूतीसाठी महिला कल्याण-कसारा लोहमार्गावरील खडवली रेल्वे स्थानकावरून मुंबईतील कामा रुग्णालयात जात होती. मध्येच तिला पोटात कळा येऊ लागल्या. अधिक वेदना होत असल्याने तिला इतर प्रवाशांच्या मदतीने डोंबिवली रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. गच्च गर्दीमूळे त्रास होत असल्याचा विचार करून रेल्वे पोलीसांनी तेथील महिलांच्या मदतीने जास्मिनला विश्रांतीसाठी आडोशाला नेले पण तिथेच जास्मिन बाळंत झाली.
मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे बुधवारी लोकल सोडण्याचा निर्णय घेतल्याने अगोदरच गर्दीचे सर्वात जास्त स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती. प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना लोकलमध्ये चढणे-उतरणे अवघड झाले होते. अशातच खडवली येथे राहणाऱ्या जास्मिन हिने बुधवारी सकाळच्या सुमारास साडेसहा वाजता लोकलने मुंबईतील कामा हॉस्पिटलला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. मात्र अचानक जास्मिनला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला इतर प्रवाशांच्या मदतीने डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरवण्यात आले. त्यावेळीही जास्मिनला अधिकच वेदना होऊ लागल्याने रेल्वे पोलीस शिपाई मनियार बाबर आणि जगदाळे यांनी येथील उपस्थित महिलांच्या मदतीने जास्मिनची प्रकृती सुखरूप व्हावी म्हणून आडोशाला नेले. तिथे ही महिला बाळंत झाली त्यानंतर तिला बाळासह महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.