ठाणे -लग्न जुळविणाऱ्या एका वेबसाईटद्वारे 'वर' शोधणाऱ्या 36 वर्षीय महिलेची 7 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गिफ्ट पाठवल्याच्या बहाण्याने 7 लाख 13 हजार 500 रुपयांना बंटी-बबलीने गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन एका अनोखळी भामट्यासह त्याच्या महिला साथीदारावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये ३६ वर्षीय महिला राहते. ती एका ठिकाणी नोकरी करीत असून तिला लग्न करायचे असल्याने तिने लग्न जुळविणाऱ्या एका वेबसाईटवर स्वतःच्या फोटोसह लग्न जुळवण्यासाठी लागणारी माहिती टाकली होती. त्या वेबसाईटवर माहिती पाहून एका भामट्याने पीडितेवर प्रभाव पाडण्यासाठी इंग्रजी बोलून तिच्याशी मोबाईलवरून संवाद साधत ओळख निर्माण केली. मात्र, पीडित महिलेला तो बोलत असलेली इंग्रजी भाषा कळत नसल्याचे तिने सांगून मोबाईल बंद केला.
त्यांनतर या भामट्याने पीडित महिलेच्या मोबाईलवर व्हाट्सअप चॅटिंग करून तू मला आवडते, मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे. असे लिहून व्हाट्सअप चॅटिंग केली. मात्र, त्यांनतर पीडित महिलेने मला एवढ्या लांब राहणाऱ्या मुलासोबत लग्न करायचे नाही, असे सांगितले. त्यावर ठीक आहे लग्न करू नको माझ्याशी, मात्र मी तुला पाठवीत असलेले गिफ्ट तरी घे, असे बोलून पीडित महिलेला गिफ्टचे आमिष दाखवले.
त्यांनतर काही वेळाने एका अनोखळी महिलेने पीडितेला मोबाईलवर संपर्क करून आपले गिफ्ट आले आहे. ते सोडविण्यासाठी पंजाब नॅशनल बँक, आणि युनियन बँकमध्ये रक्कम जमा करावी लागले. यावर पीडितेने संबधित बँकेत 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2020 पर्यत 7 लाख 13 हजार 500 रुपये भामट्या महिलेने दिलेल्या खात्यात जमा केले. मात्र, 15 दिवस उलटूनही गिफ्ट मिळाले नाही. त्यामुळे पीडित महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या अनोखळी भामट्यासह तिच्या महिला साथिदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. बी. आंबेकर करीत आहेत.