ठाणे -कल्याणमधील आधारवाडी जेलमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या महिलेने, जेलच्या शौचालयात आज दुपारच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. मायाबाई रामदास आगळे (५२) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
मायबाई ही ठाणे येथील चिराग नगर येथे कुटूंबासह राहत होती. तीला शिवाजी रामदास आगळे (वय 25) व सतीश रामदास आगळे (वय 24) अशी दोन मुले होती. त्यापैकी शिवाजी हा एका डेअरीमध्ये काम करत होता. तर सतीश हा बेरोजगार होता. मायाबाई दुसऱ्यांच्या घरातील छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होती. मात्र तिचा लहान मुलगा सतीश हा दारू पिऊन घरात सतत त्रास द्यायचा, पैशांची मागणी करायचा. त्यामुळे सतीशच्या सततच्या त्रासाला कंटाळून मायाबाईने अखेर आपला मोठा मुलगा आणि दुरच्या एका नातेवाईकाच्या मदतीने सतीशची 7 जानेवारीला हत्या केली. व पुरावा नष्ट करण्यासाठी तिने सतीशचा मृतदेह कसारा घाटात फेकला, मात्र पोलिसांनी अवघ्या 4 तासांमध्ये या हत्येचा शोध लावला होता.