ठाणे - शेजारचा २ वर्षाचा चिमुरडा घरात आल्याच्या रागातून शेजारीण राहणाऱ्या एका महिलेने त्या चिमुरड्याला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याचे दोन्ही हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना भिवंडी शहरानजीकच्या मीठ पाडा या भागात घडली आहे. मात्र, सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भिवंडी तालुका पोलिसांनी पाच दिवसांनंतर मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरु केला. मोहम्मद कैफ सोनू शेख (वय 2 वर्ष) असे गंभीर जखमी चिमुरड्याचे नाव आहे.
मुमताज शेख - चिमुकल्याची आई
चिमुरड्याची आई मुमताज शेख हिने दिलेल्या महितीनुसार, भिवंडी लगत शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मिठपाडा केडीया कंपाऊंड येथील झोपडपट्टीत आपल्या चार मुलांसह राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलांची पालनपोषणची जबाबदारी तिच्यावर पडल्याने ती लग्न समारंभात भांडी धुण्याचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करते. गुरुवार 26 मे रोजी ती सायंकाळी आपल्या 12 व 7 वर्षांच्या मुलांच्या हाती दोन व दहा महिन्याच्या चिमुरड्यांना सोपवून कामावर गेली असता शेजारी राहणारी आरोपी झरीना या महिलेने दोन वर्षांचा मोहम्मद कैफवर आपल्या घरात आल्याचा राग मनात ठेवून त्यास बेदम मारहाण करत त्याचे हात व पाय मुरगळले अशी माहिती रात्री घरी आल्यावर मुमताज हिला तिची मोठी मुलगी मुस्कान हिने घडलेली हकीकत सांगितली.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुमताज आपल्या चिमुरड्याला घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गेली असता तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी महिला झरीना हिस बोलावून घेत मुमताज हिस मुलाला प्रथम उपचारासाठी घेवुन जाण्याचा सल्ला दिला. मुमताज हिने जखमी मोहम्मद कैफ यास प्रथम भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी रुग्णालय येथे घेऊन गेली. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कळवा येथिल शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. कळवा रुग्णालयात चिमुरड्यावर उपचार सुरू असताना औषध व उपचार साहित्य बाहेरून आणण्यास सांगितल्याने त्यातच मुमताज कडील पैसे संपल्याने मुमताज ही चिमुरड्यास घेऊन सोमवारी सायंकाळी भिवंडीत दाखल झाली. त्यावेळी मुलगा तापाने फणफणत होता.
चार दिवसांनंतर गुन्हा दाखल -याबाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी महिला तक्रार देण्यासाठी आली होती. त्यावेळी स्टेशन डायरीला नोंद घेऊन आरोपी महिलेला बोलावून घेतले. परंतु मुलगा गंभीर जखमी असल्याने त्यास प्रथम उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला तर कळवा पोलिसांनी आम्हाला अजुन कळवले नसल्याचे सांगत तालुका पोलिसांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार - विशेष म्हणजे घटना घडून चार दिवस उलटून गेले होते. तरी तालुका पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने तक्रारदार महिलेसह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कळवा रुग्णालयात स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद करीत त्याची माहिती वेळीच भिवंडी तालुका पोलीस ठाण्यास का दिली नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकंदरीतच भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील यंत्रणेचा भोंगळ कारभार या घटनेनंतर समोर आला असून यावर वरिष्ठ काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.