ठाणे - कल्याणच्या रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी थरारक घटना घडली. कौंटुबिक वादाला कंटाळून एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर झोकून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून एका आरपीएफ जवानाने या महिलेला वाचविण्यात यश मिळविले आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेला वाचविणाऱ्या आरपीएफ जवान जितेंद्र यादव यांचे कौतुक करण्यात येत आहे. सुमंगल वाघ असे या महिलेचे नाव आहे. ही महिला कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहते. कौटुंबीक वादाने त्रस्त असल्याने महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.
ही महिला कल्याण स्टेशनजवळ उभी होती. यावेळी समोरुन पुष्पक एक्सप्रेस धडधडत येत असतानाही ती महिला रेल्वे ट्रॅकवरच उभी होती. आरपीएफ जवान जितेंद्र यादव यांनी तिला एक्स्प्रेस येत असल्याचा आवाज देऊन रेल्वे ट्रॅकपासून बाजूला होण्यास सांगितले.
परंतु आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आलेली महिला सरळ रेल्वे ट्रॅकवर झोपली. महिला ट्रॅकवर झोपताच जवान जितेंद्र यांनी येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या चालकाला ओरडत इशारा केला. रेल्वे गाडीची गती कमी असल्याने इंजिन महिला असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन पास झाले. दुसरा डबा पास होण्याआधीच जवान जितेंद्र यादव यांनी रेल्वे ट्रॅकमधून महिलेला बाहेर खेचून काढले.
जवान जितेंद्र यादव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून महिलेला खेचले. त्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला आहे. धाडसी जवान यादव यांचे बघ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.