ठाणे- वसई-विरार महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका महिलेला पालिका आयुक्तांनी त्यांच्या घरची धुणी-भांडी आणि इतर काम करायला लावल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, एक दिवस काम केल्यानंतर महिलेने याबाबतची तक्रार पोलिसात आणि न्यायालयात दिली. योगिता जाधव असे त्या महिलेचे नाव आहे.
योगिता या गेली पाच वर्ष वसई-विरार महानगरपालिकेत काम करतात. वडिलांच्या मृत्यूनंतर योगिता यांना महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली आहे. योगिता यांच्याकडे परिचारिकेचाही अनुभव आहे. त्यामुळे योगिताची नियुक्ती पालिकेच्या रुग्णालयात टंकलेखक पदावर केली होती. मात्र, आयुक्त गंगाधरण डी यांनी गेल्या महिन्यात योगिता आणि इतर एका महिलेला घरगुती कामासाठी बोलावले. त्यांच्याकडून धुणी-भांडी, मासे साफ करणे, शौचालय साफ करणे, कपडे धुणे, जेवण बनवणे असे काम करुन घेतले असल्याचा योगिताचा यांचा आरोप आहे. याबाबत योगिता यांनी न्यायालयात तक्रार केली आहे.