ठाणे- पर्यावरण रक्षणासाठी झगडणार्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. मात्र, आता त्यांनी भीमा कोरेगाव, इंदूमिल आंदोलनासह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली. मागणी मान्य न केल्यास येत्या 17 डिसेंबरला मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तसेच मुंबईतील दादर येथील इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमला होता. मात्र मानवंदना देऊन घरी परतणार्या आंबेडकरी अनुयायांवर अमानुष हल्ला केला गेला, दगडफेक करण्यात आली. समाजकंटकांनी योजनाबद्धरीतीने अनेक गाड्यांची तोडफोड केली व जाळपोळ केली. या हल्ल्यात अनेक बांधव जखमी झाले होते. या प्रकारामुळे दलित समाज अस्वस्थ झाला होता. या प्रकारचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील दलित समाज स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरला होता.
तत्कालीन सरकारविरोधातील खदखद व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो तरूणांवर व महिलांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय, इंदूमिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा, असे त्यांनी म्हटले.
भैय्यासाहेब इंदिसे, रिपाइं एकतावादीचे नेते तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव 1949-50 मध्ये दिला होता. आता मराठा समाजाने त्याच उद्देशाने मोर्चे काढले. मराठा समाजाने अत्यंत शांततेत मोर्चे काढलेले असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकप्रकारे या समाजावर तो अन्यायच आहे. त्यामुळे मराठा मोर्चा आंदोलकांवरीलही गुन्हे तत्काळ मागे घेऊन आपले सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘न्याय संकल्पनेवर’ चालत आहे, हे दाखवून द्यावे, असेही भैय्यासाहेब इंदिसे यांनी म्हटले आहे. येत्या 16 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे न घेतल्यास 17 डिसेंबरला मंत्रालयासमोरच दलित- मराठा समाजाकडून एकत्रितपणे निदर्शने करण्यात येतील, असेही इंदिसे यांनी म्हटले आहे.