ठाणे : इंजिनियर पतीसह सासूला जेवणातून विषारी पावडर टाकून संपत्ती हडपण्यासाठी जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. संचिता भवार (पत्नी), राहुल गुलाब भवार (चुलत भाऊ) आणि सुनीता भवार तसेच मोलकरणी सुनीता असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून पत्नीसह चौघांनी कल्याण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता. मात्र अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्नीसह चौघांचाही अर्ज फेटाळला आहे.
सुमेध आणि संचिताचा प्रेमविवाह :अंबरनाथ पूर्व भागातील नवरे नगरमधील रॉयल पार्कमध्ये तक्रारदार सुमेध भवार कुटुंबासह राहत असून ते पेशाने इंजिनियर आहे. त्यांची अंबरनाथ एमआयडीसीमध्ये 'पाईप टेक इंजिनियरींग' या नावाने कंपनी आहे. त्यातच सुमेध यांची संचिताशी ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी त्यांचा विवाह ९ ऑगस्ट २००९ रोजी मोठ्या थाटात लावून दिला. विवाहाच्या तीन वर्षांत दोन मुले झाली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होऊ लागले. त्यामुळे पत्नीने २०१३ साली महिला तक्रार निवारणमध्ये पती विरोधात अर्ज दिला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये नातेवाईकांनी समेट घडवून यापुढे वाद होणार नाही, असे सांगत प्रकरण मिटवले.
असे फुटले बिंग :सुमेध यांच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेने त्यांना तुमची पत्नी, चुलत भाऊ हे जेवण तयार करणाऱ्या सुनीता मोलकरणीच्या मदतीने तुमच्या जेवणात पावडर टाकत असल्याची माहिती दिली. तसेच त्या पावडरची पुडी सुमेध यांना दिली. त्यांनी ती पावडर नवी मुंबईतील एका लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून डॉक्टरचा सल्ला घेतला. दुसरीकडे पावडर विषारी द्रव असल्याचा अहवाल लॅबकडून मिळाला. मात्र तोपर्यंत सुमेध यांना शारीरिक त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरकडे जाऊन उपचार सुरू केले. दरम्यान आईलाही त्रास होत असल्याचे पाहून त्यांनी आईची डॉक्टरकडे तपासणी केली. यावेळी दोघांनाही सारखाच शारीरिक त्रास जाणवत असल्याचे समोर आले. त्यानंतर सुमेध यांनी इंटरनेटवर या पावडर संबंधी माहिती पाहिली असता, मुंबईतील एक घटना त्यांच्यासमोर आली. त्यामध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या जेवणात पावडर घालून मारल्याचे त्यांना समजले.