ठाणे- मागील काही वर्षांत 'डी' कंपनीची मोठी वाताहत झाली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने इकबालला घरातून अटक केल्यानंतर डी कंपनीच्या अस्ताला सुरुवात झाली आहे. आता रिझवानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे दाऊद गँगचा उत्तराधिकारी कोण? हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
'डी' कंपनीला सांभाळणार कोण? 'डी' कंपनीचा वारसा यावरून कंपनीत पूर्वीच वाद उफाळून आला होता. 'डी' कंपनीचा उत्तराधिकारी समजणारा छोटा शकील उर्फ हाकेला याचाही भ्रमनिरास झाल्याने वादाची ठिणगी पडली होती. दरम्यान, इकबाल कासकर भारतात येण्यापूर्वी दाऊदचा सर्व व्यवहार आणि काळी माया ही दाऊदची बहीण हसीना पारकर उर्फ हसीना आपा सक्षमपणे सांभाळत होती. पण, भारतात इकबाल कासकर आल्यानंतर आणि हसीना आपा हिचे निधन झाल्यानंतर मुंबईत दाऊदचे पोस्टर कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, हसीना आपा नंतर दाऊदचा वारसदार मुंबईत असलेल्या इकबाल कासकर झाला. दरम्यान, ठाणे खंडणी विरोधी पथकाने ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात इकबाल कासकर याला १८ सप्टेंबर, २०१७ ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एकामागून एक तीन खंडणीची गुन्हे खंडणी विरोधी पथकाने इकबाल कासकरवर दाखल केले. त्यानंतर इकबाल कासकर याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या इकबाल कासकर हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.
इकबाल कासकरला ठाणे कारागृहात भेटण्यास आला होता रिझवान
ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या इकबाल कासकर याला भेटण्यासाठी त्याचा मुलगा रिझवान आल्याच्या बातम्या पसरल्या हॊत्या. मात्र, नक्की इकबाल याला भेटण्यासाठी कोण कोण आले होते याबाबत संभ्रम आहे. मात्र, आता रिझवानला मुंबई पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान 'डी' कंपनीचा उत्तराधिकारी असलेला इकबाल कासकर हा कुचकामी ठरला. कारागृहात जवळपास २ वर्ष बंदिस्त राहिल्याने दाऊद कंपनीची सूत्र मुंबईतून रिझवान हलवत नव्हता ना? असे प्रश्नचिन्ह रिझवानच्या अटकेने उपस्थित होत आहे. मात्र, दाऊद कंपनीशी संबंधित कुठल्याच कारवाईत रिझवान हा प्रकाशझोतात आलेला नसताना मुंबई सोडून जाणाऱ्या रिझवानला मुंबई पोलिसांद्वारे अटक करणे म्हणजे दाऊद कंपनीच्या कारवायात रिझवानचा शिरकाव असल्याचे संकेत मिळत आहे. हसीना आपा नंतर इकबाल कासकरही कारागृहात आहे. त्यामुळे कदाचित अंडरवर्ल्डवर मुंबईत दाऊदचे निसटते साम्राज्य सावरण्यासाठी रिझवानने सूत्र हाती घेतली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रिझवानच्या पलायनाच्या घटनेने आणि मुंबई पोलिसांद्वारे अटकेच्या घटनेने मात्र मुंबईत 'डी'या कंपनीची सूत्र रिझवानच्या हातात सोपवण्यात आलेली आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारागृहात इकबालची नाकेबंदी, परिस्थितीही हालाखीची
तीन खंडणीचे गुन्हे आणि मोक्काअंतर्गत कारवाई, यामुळे जवळपास २ वर्षांपासून ठाणे कारागृहात बंदिस्त असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सख्खा भाऊ इकबाल कासकर याची कारागृहात नाकेबंदी करण्यात आलेली आहे. कारागृहातून न्यायालयात किंवा रुग्णालयात आणलेला इकबाल कासकर अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला. न्यायालयाच्या आदेशानंतरही इकबाल याला घरचे जेवण देण्यास मज्जाव करण्यात आला, तर रुग्णालयात दाखल करण्याच्या बाबतीतही कात्री लावण्यात आली. वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने ईद रुग्णालयात किंवा आप्तेष्टांच्या गराड्यात साजरी करण्याच्या मनसुब्यांनाही कात्री लावण्यात आली. ठाणे कारागृहात मधुमेहाने पीडित इकबाल कासकर हा सहकाऱ्याच्या मदतीशिवाय चालण्यास समर्थ नसल्याने कारागृहात परिस्थिती हलाखीची असल्याचे चित्र आहे.
रिझवानला मुंबई पोलिसांद्वारे अटक करणे आणि रिझवानचे विमानाने देशाबाहेर किंवा मुंबईबाहेर जाण्याचा प्रयत्न करणे, यामुळे रिझवानचा 'डी' कंपनीच्या कारवाईत शिरकाव होत असल्याचे स्पष्ट होत आहे.