ठाणे- शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईला फेब्रुवारी महिन्यातच सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसह धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणांच्या काठावरील गाव-पाड्यांना हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अपयश दिसून आले असून पाणीपुरवठा योजनांचा तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
धरण उशाला कोरड घशाला, शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई - shahapur
तालुक्यातील मोडकसागर धरण हे ज्या टेंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्याच ग्रामपंचायतीमधील १५ गाव-पाड्यांना आज भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
मुंबई, ठाणे महानगरीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात मोडकसागर, भातसा, तानसा, मध्य वैतरणा ही महत्त्वाची धरणे आहेत. याच धरणांमधून मुंबई, ठाणे शहराला लाखो लिटर पाणीपुरवठा दिवस-रात्र केला जातो. मात्र तालुक्यातील मोडकसागर धरण हे ज्या टेंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्याच ग्रामपंचायतीमधील १५ गाव-पाड्यांना आज भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरण उशाला पण कोरड घशाला अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे. येथील १ हजार ३८८ आदिवासी लोकसंख्या असलेल्या १५ पाड्यांना दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी विहिरींवर झुंबड उडते. टेंभा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ८ कूपनलिका असून त्या नादुरुस्त आहेत. त्या कूपनलिका दुरुस्त केल्यास काही प्रमाणात पाणीटंचाई दूर होण्यास मदत होवू शकते, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
तर डोळखांब - कसारा या मुख्य रस्त्यावरून २ किमी दुर्गम भागात तसेच तळवडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गांडूळवाड या गावातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आटल्याने आणि पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्यामुळे येथील महिलांना आणि पुरुषांना टँकरने आलेले पाणी पुरत नसल्याने ३ किमी अंतरावरील एका खाजगी फार्महाऊसमधून आपली पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पाणी योजनेचा उडालेला बोजवारा, टँकरचे अपुरे पाणी, गावातील विहिरींमध्ये पाणी नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच पाण्याशिवाय येथील लोकांच्या घशाला कोरड पडली आहे. दरवर्षी होणाऱ्या या पाणी समस्येने येथील महिला वर्ग कमालीचा संतप्त झाला असून शासनाचा पाणीपुरवठा विभाग किमान आतातरी शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या कोरड पडलेल्या घशाला घोटभर पाणी देणार का ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.