ठाणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा केली गेली आहे. मात्र, शहापूर तालुक्यातील निभाळपाड्यात राहणाऱ्या महिलांच्या मनात पिण्याच्या पाण्यापुढे कोरोनाची भीतीच उरली नाही. तर पाणीटंचाईमुळे त्यांच्या वाट्याला रोजचीच भटकंती आली आहे.
शहापूर तालुक्यात पाणीटंचाईला मार्च महिन्यातच सुरुवात झाली आहे. आदिवासी वाड्यांसह धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही आता एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, याच धरणांच्या काठावरील गाव-पाड्यांना तर हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपुरवठा विभागाचे अपयशच दिसून आले आहे.
दुसरीकडे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी पुकारली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनाकडून वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की कोणीही घराबाहेर पडायचे नाही. त्यांनतर केंद्र सरकारने लॉकडाऊन पुकारला आहे. मात्र, शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागातील निभाळपाडा येथील महिलांना स्वतःला घरात लॉकडाऊन करून घेणे शक्यच नसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
निभाळपाड्यातील महिलांची व्यथा या महिला पाण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून पायपीट करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनाला घाबरून घरात बसल्यास पाणी भरायचे कोणी ? आणि घरात पाणी नसले तर कोरोनाच्या अगोदर पाण्याविनाच मरावे लागेल. त्यामुळे, आम्ही घरात बसून राहू शकत नाही. सरकारला जर आमची काळजी असेल तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी प्रतिक्रिया पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिलांनी दिली आहे.