ठाणे -धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षापासून उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. यावर उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केले जातो. यंदाही ११ पाण्याच्या टँकरद्वारे ५ गाव आणि २७ आदिवासी पाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्याची संख्या तिप्पटीने वाढ होणार असून गेल्या वर्षाप्रमाणे १८ टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याचे संकेत शहापूर पाणी पुरवठा विभागाकडून ( Shahapur Water Supply Department ) देण्यात आले. मात्र, पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहापूर तालुक्यासाठी प्रस्तावित असलेली भावली पाणी योजना होईपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.
महानगरासाठी प्रतिदिनी साडेचार हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा -मुंबई, ठाणे महानगराची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला तरीही पाणीटंचाईने ग्रासले आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांवरील कूपनलिकांनासह विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून या गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून काही गावपाडे वगळता बहुतांशी गावपाड्यांवर दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे महिला भगिनींना पाण्याच्या टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. भातसा, तानसा व वैतरणा या शहापूर तालुक्यातील मोठ्या जलाशयातून मुंबई, ठाणे या दोन महानगरासाठी प्रतिताशी व प्रतिदिनी साडे चार हजार दशलक्ष लिटर प्रमाणे पाणी पुरवठा पोहचते.
सध्याच्या घडीला ११ टँकरद्वारे पाणी पुरवठा -शहापूर तालुक्यातून महानगरासाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो तालुका सध्या तहानलेला आहे. शहापूर तालुक्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ३ लाख १४ हजार १०३ एवढी लोकसंख्या आहे . तर २२८ महसूल गावांचा समावेश असून ११० एवढ्या ग्रामपंचायती आहेत. पाणी टंचाई कृती आराखड्यात दरवर्षी गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा मार्च महिन्यात पाणी टंचाई सुरू झाली असून कसारा दुर्गम भागातील कोठारे - थ्याचा पाड्यासह ५ गाव १३ पाड्यांना सध्याच्या घडीला ११ टँकर मंजूर करून त्याद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मे अखेर टँकरचा आकडा दुप्पटीवर जाणार आहे. तालुक्यातील कसारा, वाशाळा, दांड, शिरोळ, अजनुप, खर्डी आदी परिसरातील अनेक गावपाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची तयारी पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.