ठाणे : म्हाडा आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन कोविड हेल्थ केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. या कोविड सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ई-लोकार्पण पद्धतीने करण्यात आले. मात्र, उद्घाटनाच्या रात्रीच पाऊस सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी 'स्व. मीनाताई ठाकरे' मंडई येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सभागृहाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये पावसाची पाणी गळती सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मीरा भाईंदरमधील रुग्णांना उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा पुरेशी नव्हती. राज्य शासनाच्या मदतीने पालिकेने दोन कोविड सेंटर तयार केले. स्व. प्रमोद महाजन व स्व. मीनाताई ठाकरे सभागृह येथे कोविड सेंटर उभारले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. तर, त्याच रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे स्व. मीनाताई ठाकरे सभागृहाबाहेरील आवारात बनवण्यात आलेल्या खोलीत पाणी गळती सुरू झाली. पाणी गळती सुरू झाल्यामुळे सभागृहातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. शेवटी कर्मचाऱ्यांना हातात झाडू, खराटे घेऊन पाणी काढावे लागले.