ठाणे- सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानासाठी संविधानाने दिलेल्या मताधिकाराद्वारे कार्यक्षम उमेदवाराची निवड करून लोकशाही बळकट करावी, असा संदेश बाईक रायडर्सच्या माध्यमातून आज देण्यात आला. ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृतीपर बाईक रॅलीला निवडणूक निरीक्षक शैली किष्णानी यांच्या शुभहस्ते ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. आरफोरसी या सामाजिक संस्थेचे सुमारे १०० हून आधिक बाईक रायडर्स या रॅलीत सहभागी झाले होते .
यावेळी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी रेवती गायकर, उपायुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. चारूशीला पंडित, सहायक आयुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. अनुराधा बाबर आदी उपस्थित होते.
"सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो", "बाते अभी अधुरी है, वोट देना जरूरी है", अशा घोषणा देत मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून ते आपण पार पाडले पहिजे आदी जनजागृतीपर संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी सज्ज व्हा, असा संदेश देणारा चित्ररथ देखील या रॅलीत सहभागी करण्यात आला होता. दरम्यान गेली ३० वर्षे आपल्या बाईकवरून संपूर्ण महाराष्ट्रभर मतदान जनजागृती करणारे पुण्याचे बापूराव गुंड हेदेखील या बाईक रॅलीत सहभागी झाले होते. ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानात सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन गुंड यांनी मतदारांना यावेळी केले.