ठाणे- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा मतदानाच्या टक्केवारीत भरघोस वाढ होण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगातर्फे कल्याण पश्चिममध्ये 'महा मतदार जनजागृती रॅली" चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये दिव्यांग मतदार, कल्याण आयएमएचे पदाधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते,
ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर आणि निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सायकल रॅली, मॅरेथॉन स्पर्धा या सारखे कार्यक्रम राबवून अधिकाधिक मतदारांनी हक्क बजवावा, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवी हा उद्देश समोर ठेवून आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महा मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.