ठाणे - रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने रेमंड लिमिटेडने 'विंटेज अँड क्लासिक कार्स अँड बाईक्स एक्झिबिशन' चे आयोजन केले होते. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूआयएए), पोलीस आणि आरटीओच्या सहयोगाने हे प्रदर्शन पार पडले.
...आणि ठाणेकरांच्या नजरा खिळल्या व्हिंटेज कार आणि बाईक्सवर पाहताक्षणी ज्यांच्यावर डोळे अक्षरशः खिळून राहावेत अशा रोल्स रॉयस, बेंटले, अल्विस, हडसन यासारख्या शानदार कार आणि हार्ले डेव्हिडसन, ट्रिम्फ, रॉयल एन्फिल्ड या बाईक्स रेमंड शोरूममध्ये प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया, डब्ल्यूआयएएचे कार्यकारी संचालक नितीन डोसा, फिवाचे (फेडरेशन इंटरनॅशनल डेस वेहिक्युलस एन्शियंस) अध्यक्ष टिड्डो ब्रेस्टर्स आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.
हेही वाचा -खुशखबर..! कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर
'या प्रदर्शनाला मोटारप्रेमींसह सर्वसामान्य लोकांकडूनही नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यात पहिल्यांदाच होत आहे. यामध्ये माझ्या व्यक्तिगत कलेक्शनमधील खास निवडून आणलेल्या विंटेज कारदेखील ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन दिले जात आहे,' अशी प्रतिक्रिया यावेळी रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गौतम हरी सिंघानिया यांनी दिली. १८९४ सालाची मर्सिडीझ आणि १८९९ मधील फोर्ड कारही या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. 'पेबल बीच कोनकोर्स डी एलिगंस' या सर्वाधिक प्रतिष्ठित कार शोची विजेता असलेली अल्विस कारदेखील या प्रदर्शनात होती.
हेही वाचा -मेट्रो प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; स्थानकावर उतरताच २ रुपयात मिळणार सायकल
या पाच दिवसीय प्रदर्शनाची सांगता रविवारी मोठ्या रॅलीने करण्यात आली. आनंदनगर चेकनाक्यापासून रेमंड गेटपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्यावहिल्या विंटेज रॅलीने २१.२ किमी अंतर पार केले. ही रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.