ठाणे- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. इंदोरीकर महाराज यांनी चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल, असे विधान केले असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप वंचितच्या वतीने करण्यात आला आहे.
इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडीचे ठाण्यात उपोषण - वंचित बहुजन आघाडीचे ठाण्यात उपोषण
इंदोरीकर महाराज यांनी चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल, असे विधान केले असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.
हेही वाचा -'भिवंडीतील आमदारांचा मेट्रोच्या नियोजित मार्गाला पाठिंबा केवळ रिलायन्सच्या फायद्यासाठी'
याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने वर्तक नगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या संदर्भात चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले होते. मात्र, 6 दिवसानंतरही गुन्हा दाखल केला नाही. त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही अथवा इंदोरीकर महाराज प्रसारमाध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.