ठाणे - शहापूर तालुक्यातील वासिंद शहर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला इसिस व जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांच्या नावाने २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी सापळा रचून खंडणीखोर तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. वैभव किसन सातपुते असे अतिरेकी संघटनांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तरुणाचे नाव असून तो शहापूर तालुक्यातील टेंभरे गावाचा रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
धमकीच्या लिफाफ्यावर उर्दू भाषेत इसिस अतिरेकी संघटनेचा लोगो
वासिंद शहर शिवसेनेचे पदाधिकारी व उद्योजक दत्ता ठाकरे यांच्या पत्नीकडे दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने काही दिवसांपूर्वी खाकी लिफाफा दिला. हा लिफाफा दत्ता शेठ यांना देण्यास त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले. या लिफाफ्यावर उर्दू भाषेत इसिस अतिरेकी संघटनेचा लोगो होता. चिठ्ठीमध्ये "आम्ही 'जैश-ए-मोहम्मद'चे कमांडो आहोत. आमचा लढा तुमच्या विरोधात आहे. आम्हाला हत्यारे खरेदी करायची आहेत. यासाठी शहापूर तालुक्यातील अघई रोडवर १६ तारखेपर्यंत २५ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला व तुझ्या मुलाला ठार मारू, तसेच पोलिसांना कळवल्यास तर याद राख" असे ठळक अक्षरात लिहून, मजकुराखाली प्र. मो. अन्सारी अशी मराठीत सही असल्याचे आढळून आले.
धमकीच्या पत्रामुळे शिवसैनीकांमध्ये खळबळ
धमकीच्या पत्रातील मजूकर वाचून दत्ता ठाकरे यांनी तत्काळ वाशिंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन धमकीच्या पत्राबाबत तक्रार दाखल केली. दुसरीकडे या धमकीच्या पत्रामुळे शिवसैनीकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दाखल घेऊन दत्ता ठाकरे यांच्या पत्नीला धमकीचे पत्र असलेला खाकी लिफाफा देणाऱ्या तरुणाची चौकशी केली. चौकशीत हा तरुण टेंभरे गावातील वैभव सातपुते असल्याचे समोर आले होते. तसेच पोलिसांनी त्याच्या टेंभरे गावात जाऊन चौकशी केली असता वैभव बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर असतानाच आरोपी वैभव हा दत्ता ठाकरे यांच्या घराच्या आसपास असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत.