मीरा भाईंदर(ठाणे)-मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या वंदना मंगेश पाटील यांची तर उपसभापतीपदी सुनिता शशिकांत भोईर यांची निवड झाली आहे. तर परिवहन समितीच्या सभापतीपदी भाजपचे दिलीप रूपचंद जैन यांची निवड झाल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांनी जाहीर केले आहे.
भाजपची एकहाती सत्ता
महिला बालकल्याण व परिवहन समितीच्या सभापती पदाकरता मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आज निवडणूक घेण्यात आली. भाजपाच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती पदाकरता वंदना मंगेश पाटील तर उपसभापती पदाकरता सुनिता शशिकांत भोईर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर परिवहन समिती सभापती पदाकरीता भाजप नगरसेवक दिलीप रूपचंद जैन यांनी अर्ज दाखल केलेला होता.महिला बालकल्याण समिती सभापती पदाकरीता शिवसेनेच्या तारा विनायक घरत आणि उपसभापती पदाकरीता मर्लिन डिसा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर परिवहन समिती सभापती पदाकरीता शिवसेनेचे राजेश हरिश्चंद्र म्हात्रे यांनी अर्ज दाखल केलेला होता.