ठाणे - मुंबई, ठाणे पाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र लसीकरणाची सुविधा उभारण्यात आली आहे. 2 जून आणि 3 जून रोजी कल्याण पश्चिम परिसरातील लालचौकी येथील आर्ट गॅलरी कोविड लसीकरण केंद्रात सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच परदेशात प्रवेश
परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'वॉक इन' पद्धतीने लसीकरण मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. लसीचा तुटवडा असल्याने अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशनानुसार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची नियोजन केले. त्यानुसार लसीकरण सुरू करण्यात आले असून उद्यापासून २ दिवस विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
लसीकरणासाठी येताना ही कागदपत्रे गरजेचे
1) शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटर आयडी/पासपोर्टयापैकी एक)
2) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा (ॲड्रेस प्रुफ)