नवी मुंबई -राज्यभरात कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात पनवेल मनपा क्षेत्रात दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या लसींचा तुटवडा भासत असल्याने लसीकरण बंद केले असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -शिवथाळी : पार्सल देण्याचा आदेश आलेला नाही; महापालिकेतील कॅन्टीन चालकाची माहिती
पनवेल मनपा क्षेत्रात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे:
पनवेल महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोविडं लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या लसींचा तुटवडा असल्याने काही दिवस कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम बंद करण्यात आला असल्याचे अधिकृत पत्र पनवेल महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. पनवेल मनपाच्या माध्यमातून सध्या कोव्हँंक्सीन आणि कोव्हीशिल्ड अशा दोन प्रकारच्या लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. त्यात कोव्हीशिल्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण सुविधा बंद करण्यात आली आहे.
लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर पुन्हा होणार लसीकरण:
पनवेल महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत २१ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. यात ९ शासकिय व १२ खासगी केंद्रात हे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ६३२ लसीकरण सत्रे घेण्यात आली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ६३ हजार ८७९ जणांचे लसीकरण झाले आहे. रोज सरासरी २५०० जणांचे लसीकरण होत आहे. लसींचा साठा उपलब्ध झाला की पुन्हा हे लसीकरण सुरू करण्यात येईल, मात्र तोपर्यत हे लसीकरण बंद राहील, अशी माहिती पनवेल मनपाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हेही वाचा -ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू