ठाणे :चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रो आणि टीमचे सर्वच स्तरातून भारताचे कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर या मोहिमेला हातभार लावणाऱ्याना "इस्रो" कडून शुभेच्छा दिल्या जात आहेl. याचाच एक भाग म्हणून सुरक्षित लँडिंग करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंपनीचे देखील कौतुक होत आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट मधील "इंटरनॅशनल इंडस्ट्रियल स्प्रिंग" कंपनीने चंद्रयान मोहिमेसाठी १०० स्प्रिंग पुरवल्या होत्या. त्यामुळे या मोहिमेत ठाण्याने देखील महत्त्वाचा वाटा उचलला असल्याचं, कंपनीचे मालक सुमित गाला यांनी सांगितलं. या मोहिमेत आपला देखील सहभाग असल्याने चंद्रयान ३ यशस्वी होताच वागळे इस्टट येथील कंपनीत जल्लोष करण्यात आला. तसंच कर्मचाऱ्यांनी या यशाचं श्रेय इस्रोच्या टीमला दिलं आहे.
इंटरनॅशनल इंडस्ट्रियल स्प्रिंगचा खारीचा वाटा : अवघ्या जगाचे डोळे लागलेली चंद्रयान-३ मोहीम बुधवारी फत्ते झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पहिल्यांदाच हिंदुस्थानाने पहिलं पाऊल टाकत जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. या मोहिमेत देशातील अनेक राज्यांनी आपलं योगदान दिलं असून, ठाण्यातील वागळे इस्टेट मधील कंपनीने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. चंद्रयानाचे जे इंजिन आहे, त्या भागात असलेल्या प्रोप्लशन किटमध्ये ही स्प्रिंग बसवण्यात आली आहे. तापमान नियंत्रित करण्याचं काम स्प्रिंग करत आहे. यान चंद्रावर उतरताना या स्प्रिंगने प्रमुख भूमिका निभावली आहे.