ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेली अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी स्थायी समिती सभापती यांनी आयोजित केलेले शिबीर आता त्यांच्या अंगलट आले आहे. या शिबिरात एका वास्तूविशारदाने दुसऱ्या वास्तूविशारदाचे सही-शिक्के कॉपी करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी दुर्गा प्रसाद राय तसेच संशयित म्हणून स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, सेवानिवृत्त नगररचनाकार मिलिंद सोनवणे यांच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -मोदींच्याच राज्यात 'हिंदू खतरें में’; सचिन सावंतांची टीका
स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांच्या प्रभागातील व्हाईट हाऊस येथे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे शिबीर आयोजित केले होते. तेथे आरोपी आकिर्टेक्ट दुर्गा प्रसाद राय यांनी पुढाकार घेतलेल्या शिबिरात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. यात दाखल झालेल्या अर्जांपैकी १४ प्रकरणांमध्ये आकिर्टेक्ट विकास नेहेते (वय-४५) यांच्या बनावट शिक्के व सह्या मारल्याची प्रकरणे सादर करण्यात आली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून देत तक्रारी अर्ज केला होता.
अर्जाच्या चौकशीवरुन आरोपी आकिर्टेक्ट दुर्गा प्रसाद राय यांच्यासह संशयित म्हणून, सेवानिवृत्त नगररचनाकार मिलिंद सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे हे करीत आहेत.
हेही वाचा -आरबीआयच्या निर्बंधानंतर येस बँकेवर 'हे' नियम लागू होणार