नवी मुंबई -शेतकरी व कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून आमच्या सरकारने राज्याचा कारभार सुरू केला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांच्या दालनात जागा नसते, इतका सर्वसामान्य माणूस त्यांच्या अडचणी घेऊन येऊ लागला आहे. सद्यस्थितीत एक वेगळे वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. आमच्या सरकारचे राज्यात दमदारपणे काम सुरू आहे. सद्यस्थितीत महाआघाडीचे उपस्थित कार्यकर्ते रस्त्यावर प्रचारासाठी उभे राहिले, तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल, असा टोला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. नवी मुंबईतील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
...तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल - एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून नवी मुंबई विभागातील लोकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही. गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा पडता कामा नये, असे आम्ही नगरविकास खात्याच्या अधिकारी वर्गाला सांगितले आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी मुंबईत विकास घडवायचा असेल, येथील मनमानी कारभार व एकाधिकारशाही संपवायची असेल तर महाविकासआघाडीने एकत्र येणे गरजेचे आहे. भविष्यात नवी मुंबईचे परिवर्तन तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात संधी आली आहे; त्या संधीचे सोने करा, असे एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी वर्गाला संबोधले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना या निवडणुकीत नव्या मुंबईतील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
तीन वेगळ्या विचारधारेचे सरकार स्थापन होईल, असे कोणाला वाटले नव्हते. हे तीन पक्ष एकत्र कसे येतील, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. आम्ही 162 लोक असताना लोकांनी 130 आमदार असल्याची शंका उपस्थित केली. अनेक लोकांनी सरकार चालणार नाही, असेही म्हटले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार नवी मुंबई महानगर पालिकेवर काहीही करून येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. आज 20 वर्षे झाली तरीही नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, असे खासदार राजन विचारे यावेळी म्हणाले.