ठाणे -शहापूरमधील एका राईस मिलच्या मालकावर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात शुटर्सनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूर शहरातील गंगारोड परिसरात असलेल्या राईस मिलच्या बाहेरच घडली आहे. रमेश अग्रवाल (वय - ५९) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या राईस मिल मालकाचे नाव आहे.
त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
राईस मिलच्या बाहेर निघताच गोळीबार -
शहापूर शहरातील गंगारोड भागात रमेश अग्रवाल यांचा राईस मिल आहे. या राईस मिलमधून घरी जाण्यासाठी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास राईस मिलचे मालक रमेश अग्रवाल हे राईसमिल बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या दुचाकीवरून घराकडे निघण्याच्या तयारी होते. त्याच सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर जवळून गोळीबार केला. यावेळी त्यांचा मुलगा व राईस मिलचा वॉचमन उपस्थित होते.