ठाणे - ढाकुमाकुमच्या तालावर पनवेल शहर आणि ग्रामीण पट्ट्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. पनवेलमधील क्रांतिकारक सेवा संघाची अनोखी दहीहंडी आकर्षणाची ठरली. गोविंदा पथकांचा उत्साह कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारक सेवा संघाने यावेळी वेगवेगळ्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून गुणांची हंडी साजरी केली. ७ लाख ५५ हजार रकमेची बक्षीस ठेवण्यात आली होती.
पनवेलमध्ये अनावश्यक खर्च टाळून 'गुणांची हंडी'; गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव - panvel thane dahihandi
वेगवेगळ्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून गुणांची हंडी साजरी केली. यात ७ लाख ५५ हजार रकमेची बक्षीसे ठेवण्यात आली होती.
दहीहंडी उत्सवाला भरमसाठ खर्च होतो. पण दहीहंडी उत्सवाची परंपरा जपली पाहिजे म्हणून साधेपणाने दहीहंडी साजरी केल्याचे क्रांतिकारी संघटनेने सांगितले. अतिरिक्त पैसे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग केला पाहिजे, या विचाराने संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांनी ही दहीहंडी साजरी करण्याचे ठरवले. या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, २ हजार रूपये रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले. दहीहंडीचा हा अनोखा उत्सव साजरा करीत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी पूरग्रस्तांना 50 हजार रुपयांची रोख मदत क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके यांच्यातर्फे करण्यात आली.
दहीहंडी उत्सवाला हिडीस रूप आल्याची तक्रार नेहमीच होते. मात्र, गुणांच्या दहीहंडीचा हा उपक्रम खरोखरच विधायक होता. ही अनोखी दहीहंडी साजरी करताना क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे, क्रांतिकारी सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष विलास म्हसकर, कोकण विभाग अध्यक्ष भारत भोपी, आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक सचिव बी. पी. लांडगे, उपाध्यक्ष डी. के. भोपी, नरेंद्र भोपी, पनवेल तालुका युवा अध्यक्ष विकी फडके, नवीन पनवेल शहर युवा अध्यक्ष अजय फडके आदी मान्यवर उपस्थित होते.