ठाणे :जिल्ह्यात असलेल्या मुरबाड तालुक्यामधील तब्बल 40 ते 42 गावात स्मशानभूमीच नाही. यामुळे येथील गावकऱ्यांना ऊन्हात आणि मुसळधार पावसात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या लोकसभा क्षेत्रातील ही गावे आहेत. मुरबाड तालुक्यात भाजपाचे किसन कथोरे सलग तीनवेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे येथील आहेत. असे दिग्गज नेते असूनही आदिवासी गाव-पाड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत.
गावांना नाही रस्ता : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर मुरबाड तालुका आहे. तरीही या तालुक्यातील हजारो नागरीक अनेक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. खळबळजनक बाब म्हणजे तालुक्यातील 67 गाव-वाड्या पाड्यांना रस्ते नसल्याने पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नदी नाले ओलांडून ये-जा करावी लागते. हे झाले पावसाळ्याचे. उन्हाळ्यातही येथील नागरिकांना हाल सहन करावे लागतात. उन्हाळ्यात येथे भीषण पाणीटंचाईदेखील भासत असते.
स्मशानभूमी कागदावरच :या गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधादेखील नाही. यामुळे गावातील नागरिकांना भरपावसातच मृतदेहांवर अंत्यविधी करावा लागतो. मुरबाड तालुक्यात 126 ग्रामपंचायती असून यातील बहुतेक ग्रामपंचायती या ग्रुप ग्रामपंचायत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये अनेक आदीवासी वाड्या, पाड्याचा समावेश आहे. त्यामुळे अनेक ग्रुप ग्रामपंचायतींमधील स्मशानभूमी या सरकारी कागदावरच उभारल्या गेल्या आहेत. यामुळे गावकऱ्यांना एकदा मृतदेहावर अंत्यसंस्कार नदी-नाल्याच्या शेजारी उघड्यावरच करावे लागतात.
मागणी दखल कोणी घेईना : मुरबाड तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये स्मशानभूमींचा प्रश्न गंभीर आहे. काही ठिकाणी जागेची अडचण आहे. तर काही ठिकाणी निधींची कमतरता असल्याने स्मशानभूमी गावकऱ्यांना मिळत नाही. परंतु या गंभीर समस्येची लोकप्रतिनिधीसह प्रशासनही दखल घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवणार कोण? असा सवाल गावकरी करत आहेत. तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असणाऱ्या न्याहाडी ग्रामपंचायत, बळेगाव उमरोलीचे (सातपाडे ) सोनावळे ,सोनगाव, पळू, गावात स्मशानभूमी नसल्याने पळूगावातील संतोष मोरे यांनी तर स्मशानभूभीतच गेल्या वर्षी उपोषण केले होते. तरीही गावकऱ्यांना मृतदेहांवर भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागले.