ठाणे : उल्हासनगर वाहतूक विभागाने टो केलेली दुचाकी परत घेण्यासाठी टोईंग व्हॅनकडे धावत सुटलेल्या त्या तरुणाचा दुकानासमोर ठेवलेल्या जाळीत पाय अडकून समोरील रीक्षावर आदळल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेला सर्वोतोपरी वाहतूक विभाग जबाबदार असल्याचे चित्र राजकीय नेते मंडळी रचू लागल्याने काही दिवस टोइंग बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. विनय भोईर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला २२ टाके पडले आहेत. मात्र, या घटनेची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या केवळ स्टेशन डायरीत करण्यात आल्याने पोलीस नेमके कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी चर्चे शहारत रंगली आहे.
जाळीत अडकला विनयचा पाय - उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या 17 सेक्शन भागातील भाऊसाहेब मेहेरबान सिंग चौकात मोबाईल झोन हे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर 15 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विनय भोईर हा तरुण दुचाकीवरून आला. त्याला त्याच्या मोबाईलची स्क्रीन गार्ड काच बदलायची होती. त्याने त्याची दुचाकी दुकानासमोर पार्किंग फुल असल्याने दुसऱ्या उभ्या दुचाकीच्या मागे त्याची दुचाकी लावली होती. .या दुचाकीमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे गस्तीवर असलेल्या टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी टो करत व्हॅनमध्ये टाकली होती. त्यावेळी ही बाब बाजूच्या दुकानदाराने भोईर याला सांगताच, भोईर याने तत्काळ दुचाकी मिळविण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी दुकानाबाहेर दुकानदाराने लावलेल्या जाळीत विनयचा पाय अडकला आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
टॉईंग व्हॅन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय -या घटनेनंतर टोईंग वाहनावरील पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ खाली उतरून विनयला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुचाकी टॉईंग करताना कोणतीही अनाउन्समेंट न करता टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत उचलली. त्यामुळे ही घटना घडल्याचा कयास लावत वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेला सर्वोतोपरी वाहतूक विभाग जबाबदार असल्याचा आरोप नेत्यांनी केला. तर भाजप आमदार कुमार आयलानीने थेट वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त याना तक्रार केल्याने पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी टॉईंग व्हॅन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.