ठाणे - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते म्हणाले की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला. तरी कुठे काही हलायला तयार नाही.
ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण केली होती. यावरून राजकारण तापले आहे. आता उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दात हल्लाबोल केला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय, अशी थेट टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
ठाण्यातील गुंडगिरी आम्ही उखडून काढू -ठाकरे पुढे म्हणाले की, हे सरकारच नपुसंक आहे असे न्यायालयाने सांगितले, पण ते खरेच दिसत आहे. शिवसेनेचे ठाणे सुशिक्षित आहे. आता मात्र गुंडाचे ठाणे असे समिकरण झाले आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या आहेत, मग ठाण्याचे काय होणार असा प्रश्न आहे. ठाण्यातील गुंडगिरी आम्ही उखडून काढू, असा इशारा ठाकरेंनी दिला. आयुक्त जगेवर नाही. ज्या गुंड महिलांनी हल्ला केला. त्यांची नावे दिली आहेत. मात्र उपाययोजना होत नाही. फडतूस गृहमंत्री राज्याला लाभला आहे, असे ते म्हणाले.