नवी मुंबई -मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी केली आहे. मराठा आरक्षणासह विविध विषयांबाबत नवी मुंबई येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे भोसले यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीस संभाजीराजेंनी हजेरी लावली होती. मात्र, उदयनराजे उपस्थित नव्हते. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माथाडी भवनमध्ये झालेल्या या बैठकीत, येत्या 11 ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसे झाल्यास पुढील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असेल, असा इशाराही त्यांनी दिला. संभाजीराजे यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केले. आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजासोबतच खाली बसणार, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली.