ठाणे - मित्रांसोबत खदाणीच्या तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे घडली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाकडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र अंधार पडल्याने शोधपथकाला शोधकार्य थांबवावे लागले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मोहम्मद यासिम मोहम्मद ईस्लाम शेख (वय, १५ रा. शांतीनगर) व मोहम्मद इम्रान वकिल अहमद खान (वय १८, रा. गायत्री नगर ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत.
तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू मित्रांसोबत पोहायला गेले होते खदानीच्या तलावात -
पाण्यात बुडून मृत्यू झालेले मोहम्मद यासिम आणि मोहम्मद इम्रान वकिल हे दोघे त्यांच्या आठ मित्रांसोबत बुधवारी सायंकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील मस्करपाडा पोगाव येथील एका खदाणीच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. यासीम व इम्रान या दोघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. मित्र पाण्यात बुडत असल्याने या दोघांसोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलासह पोलिसांना घटनेची माहिती दिली.
सकाळी सात वाजेपासून पुन्हा शोधकार्य -
घटनास्थळी तालुका पोलीस व अग्निशमन दलाकडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सायंकाळी उशीर झाल्याने व अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.