ठाणे - महागड्या दुचाक्यांची चोरी करून त्या इतर गुन्ह्यामध्ये वापरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी केली. सिद्धार्थ उर्फ विक्की कांबळे (वय 22) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला आंबिवली येथील इराणी वस्तीतून पकडण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.
अट्टल दुचाकी चोरट्यास बेड्या; पोलिसांनी केल्या 16 गाड्याही हस्तगत आरोपीने राजू वाघ, फारुख इराणी, इन्नू इराणी आणि अली हसन इराणी या चौघा साथीदारांच्या मदतीने या गाड्या चोरल्याची कबूली खडकपाडा पोलिसांना दिली. तर चोरी केलेल्या 16 बाईक बाईक आंबिवली, बनेली, मोहना आदी परिसरातून पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
विशेष म्हणजे कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात या सर्व गाड्यांची चोरी करण्यात आली होती. या सर्व गाड्यांचे हँडल लॉक तोडून आणि डायरेक्ट वायरिंग करुन त्या चोरत असल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले. चोरी करण्यात आलेल्या या गाड्यांचा वापर चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यामध्ये केला जात होता. या 16 गाड्यांपैकी 10 गाड्या या ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या कसारा, नाशिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस तपासात त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्यातील इतर 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, हवालदार चव्हाण, पवार, ठोके, पोलीस नाईक डोंगरे, पोलीस शिपाई आहेर, कांगरे, थोरात, बडे, राठोडसह आदींच्या पथकाने केली.