ठाणे - शेजारी राहणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या भांडणाचा राग तरुणांनी घरासमोरील पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाक्यांवर काढल्याची घटना समोर आली आहे. २ तरुणांसह १ महिलेने रागाच्या भरात चार दुचाक्या आगीच्या हवाली केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा -ठाण्यात महिलेचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
ही घटना भिवंडी शहरातील हनुमान नगर, कामतघर परिसरात घडली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण ताराचंद गायकवाड, मयूर राजेंद्र टेकाळे आणि रोहिणी अशी दुचाकी जळीतप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा -वाशीत तरुणावर ५ जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहिणी या महिलेचे शेजारी राहणाऱ्या सुरजकुमार प्रेमचंद गुप्ता यांच्याशी एक महिन्यापूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. या वादातून तिन्ही आरोपींनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरजकुमार प्रेमचंद गुप्ता यांच्या दुचाकीसह प्रविण मिश्रा, इंदरकुमार पाल, अरुण विश्वकर्मा या शेजाऱ्यांच्या घरासमोर पार्क केलेल्या दुचाक्यांवर पेट्रोल टाकून त्या जाळल्या. या आगीत युनिकॉर्न, अॅक्टिव्हा, पॅशन प्रो -२, या दुचाक्या जळून खाक झाल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात दुचाकीच्या मालकांनी केली आहे.
हे ही वाचा -ठाण्यात स्पोर्ट्स बाईक चोर पोलिसांच्या ताब्यात, एक साथीदार फरार
दरम्यान, दुचाकी जळीतप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रविण गायकवाड, मयूर टेकाळे या दोघांना अटक केली आहे. रोहिणी ही फरार असून तिचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करत आहे.