ठाणे : निशा अशोक पुनवानी (वय ३५ वर्षे) आणि रेश्मा अशोक पुनवानी (वय ३६ वर्षे) असे अटक केलेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (Thane Crime News) विमल सुमेरमल शंखलेशा (वय ४९ वर्षे) यांच्या मालकीचे एम. एम. शंखलेशा ज्वेलर्स नावाने कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी परिसरात सोने, चांदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात १६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास (Thane Robbery News) दोन महिला अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्यावेळी दुकानातील कामगाराने त्यांना अंगठ्यांच्या बॉक्समधील अंगठी दाखविली. दुकानातील इतरही ग्राहकांना दागिने दाखविण्यात कामगार व्यस्त असल्याचे पाहून त्या दोन्ही महिलांनी हातचलाखीने अंगठ्या लंपास केल्या. यानंतर त्या दुकानातून निघून गेल्या.
अशी पटली आरोपींची ओळख : अंगठ्यांचे बॉक्स कपाटात ठेवत असताना त्यामधील अंगठ्या चोरीस गेल्याचे कामगारांच्या लक्षात आले. यानंतर दुकान मालक शंखलेशा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या दोन अनोळखी महिलांवर संशय व्यक्त करत त्यांच्या विरोधात १६ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल असलेल्या अज्ञात महिला आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपासासाठी दिला होता. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला आरोपींची ओळख पटवली.