ठाणे - घातक दारुपासून तयार केलेल्या फटाक्यांची रस्त्यावरच हातगाडी लावून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांचे चित्रीकरण करण्यास दोन पत्रकार गेले होते. यावेळी त्यांना मज्जाव करत, गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. ही खळबळजनक घटना कल्याणमधील अत्यंत गर्दीचे ठिकाण असलेल्या शिवाजी चौकात घडली आहे.
बेकायदा फटाके विक्रेत्यांची पत्रकारांना मारहाण; पोलिसांची बघ्याची भूमीका आतिश भोईर आणि स्वप्नील शेजवळ अशी मारहाण करण्यात आलेल्या पत्रकारांची नावे आहेत. मारहाण आणि धमकी प्रकरणी दोन्ही पत्रकारांनी या फेरीवाल्यांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास सुरु आहे.
विशेष म्हणजे, घटनास्थळी पालिकेचे फेरीवाला नियंत्रण पथकाचे वाहन, आणि पोलिसही उभे होते. मात्र त्यांनी बघ्याची भूमिका घेत, या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फेरीवालांना इशारा करीत तेथून जाण्यास सांगितले. पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर कल्याणमधील २० ते २५ पत्रकार घटनास्थळी पोहोचले. पालिका अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांसोबत असलेले हफ्ताखोरीचे कनेक्शन पत्रकारांनी उघड केल्यानंतर किशोर खुताडे नामक अधिकाऱ्याने पथकासह थातुरमाथुर कारवाईचा दिखावा केला.
दरम्यान, फेरीवाले गुन्हेगार प्रवृतीचे असून हातगाडी नावासाठी लावत आहेत. त्यांचा खरा धंदा हा ग्राहकांचे पाकीट, मोबाईल, तर महिलांच्या दागिने लंपास करीत असल्याचे आज बाजारपेठ, आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारींवरून दिसून आले.
हेही वाचा : लोहमार्ग पोलिसांची दिवाळी भेट; लोकलमध्ये चोरी/गहाळ झालेला 81 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत..