ठाणे - मुलींना वाचण्यासाठी देशभरात मोहीम सुरू आहे. मात्र, मुली नकोशी होत चालल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच उल्हासनगरमध्ये स्त्री जातीचे दोन अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. त्यापैकी एक अर्भक नाल्यात फेकले होते, तर दुसरे अर्भक उल्हासनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रुळावर फेकून दिले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रेल्वे रुळावरील दगडावर फेकल्याने मृत्यू -
उल्हासनगर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान दोन्ही रेल्वे ट्रॅकच्यामध्ये काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत नवजात स्त्री जातीचे अर्भक बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकातील ड्युटीवर असणारे पोलीस हवालदार अशोक माने यांना दिसले. त्यांनी त्वरीत महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना साळवी यांच्या मदतीने त्या नवजात अर्भकाला उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या अर्भकाला धावत्या रेल्वे गाडीतून फेकून किंवा रेल्वे रुळावर टाकून पसार झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.