नवी मुंबई -नवी मुंबई परिसरात चारचाकी वाहन चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत होती. त्याअनुषंगाने तपास करण्यात आला असता, नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अवघ्या १५ मिनिटांत कॉम्प्युटराईज चावी तयार करून कारची चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यांच्याकडून ८१ लाखांची वाहने जप्त केली आहेत.
पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग नवी मुंबई परिसरात गाड्या चोरीचे सत्र सुरूच गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई परिसरात मोटार कार चोरी होण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे याप्रकरणी नवी मुंबई शहरातील पोलीस ठाण्यात गाड्या हरवल्याच्या तक्रारी दाखल झाले होते. त्या अनुषंगाने या मोटार कार चोरीचे प्रकार उघडकीस आणण्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिले होते. त्यानुसार तपास करीत नवी मुंबई पोलिसांनी कार चोरीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केले आहे.
अशी करत होते चोरी
नवी मुंबई पोलिसांनी मोटार कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केले असून, त्यांच्याकडून १३ वाहने जप्त केली आहेत. या वाहनांची किंमत तब्बल ८१ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. आरोपी चोरी करण्यासाठी एक मशीन वापरत. या मशिनच्या साह्याने ते गाडीच्या काचेखाली असणारी वायर तोडत व ती वायर त्याच्या मशीनमध्ये कॉम्प्युटरमध्ये टाकून तेथूनच कोडिंग आणि डिकोडिंग करत असे. अवघ्या १५ मिनिटांत कॉम्प्युटराईज चावी तयार करत त्या चाविचा उपयोग करून गाडी सुरू करत होते.
१३ वर्षांपासून आरोपी करत होते चोरी
नवी मुंबई परिसरात होत असलेल्या मोटार कार चोरी प्रकरणी गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज यांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेतला. या आरोपींनी नवी मुंबई सह मुंबई, ठाणे, पनवेल, बदलापूर, भिवंडी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी कार चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हेच आरोपी त्यात आढळून आले. त्यामुळे मोहम्मद तौफिक हबीबूल्ला (४०) व मनोज गुप्ता (३४) यांना अटक केले असून संबधित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. ते गेली १३ वर्षांपासून कार चोरी करत आहेत. या कार आंतरराष्ट्रीय पातळीवर विकत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी सांगितले आहे.