ठाणे- तोकडे कपडे घातल्याच्या कारणावरून वाद घालत पर्यटनस्थळी आलेल्या दोन तरुण तरुणींच्या जोडप्यास काही टवाळखोरांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीची ही घटना मलंगगडच्या पायथ्याशी रविवारी सायंकाळी घडली आहे. तसेच या घटनेत त्या टोळक्याने मारहाणीवर न थांबता त्या दोन तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी घटना घडल्यानंतर तब्बल ३ दिवसांनी हिललाईन पोलीस ठाण्यात ६ ते ८ जणांच्या टोळक्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सध्या त्या टोळक्यातील आरोपींचा शोध घेत आहे.
तोकडे कपडे घातल्याने 2 प्रेमी युगुलांना टवाळखोरांची मारहाण
सोशल मीडियामुळे प्रकाराला फुटली वाचा ..
रविवारी संध्याकाळच्या सुमारास उल्हासनगर परिसरात राहणारे दोन तरुण आपल्या मैत्रिणीला घेऊन मलंगगडावर गेले होते. मात्र पर्यटनस्थळ व मंदिर दर्गा बंद असल्याने मलंगगडाच्या पायथ्याशीच ते थांबले होते. त्यावेळी ६ ते ८ जणांचे टोळके मद्यधूंद अवस्थेत अचानक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या जोडप्यांतील तरुणींना तोकडे कपडे का घातले याचा जाब विचारत त्या टोळक्याने या चौघांनांही काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तर त्या दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून त्या टोळक्याने तरुणींचा विनयभंग केला.
या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वत:ची सुटका करून घेत, नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसाकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही, हिललाईन पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देत घटनेकडे दुर्लक्ष केले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
तरुणींनी नेमका कोणता पेहराव कराव ?
या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाज कंटकावर कारवाई करत वेळीच याला आवर घालावा, अन्यथा नागरिकांना पर्यटनस्थळी देखील स्वताच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न देखील या पीडितांनी विचारला आहे.