ठाणे : दोन पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन मुंबई नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या दोन गुन्हेगारांना नारपोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सुनिल मंगल डब (४३ रा.उत्तर पूर्व,दिल्ली), कृणाल किसनलाल वाल्मिक (२५ रा.हरिद्वार,उत्तराखंड) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
अग्निशस्त्र बाळगण्यास मनाई :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ३ एप्रिल २०२३ ते १९ एप्रिल पर्यंत कोणतेही घातक शस्त्र अगर अग्निशस्त्र बाळगण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. मात्र, पोलीस आयुक्तांचे मनाई आदेश असतानाही पर राज्यातील दोन गुन्हेगार पिस्टल, जिवंत काडतुसे घेऊन ठाण्याच्या दिशेने जाणार असल्याची खबर नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांना मिळाली होती.
पाळत ठेवून रचला सापळा :त्यानुषंगाने १७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांनी पोलीस पथकासह मुंबई- नाशिक महामार्गावरील मानकोली ब्रिजखालील अरुणकुमार क्वॉरीच्या समोर पाळत ठेवून सापळा रचला होता. त्यावेळी संशयित रित्या गुन्हेगार सुनिल, कृणाल हे दोघेही मुंबई- नाशिक महामार्गावरील मानकोली गावाच्या हद्दीत आढळून आले. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांना ताब्यत घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता, दोन्ही गुन्हेगारांकडे पिस्टल, काडतुस आढळून आली.