ठाणे -मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने तरुणाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. करण रामलाल यादव (२२) अनिल नामदेव भोईटे (३७) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात राहणारे आहेत. हे २ आरोपी बँक समोर उभे राहून व्यक्तीला हेरून मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने अनेकांना लुटत होते.
मोबाईल फोडल्याचा आरोप, तरुणाला लुटणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना अटक - मध्यवर्ती पोलीस ठाणे
मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने तरुणाला लुटणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेमलाला बुढा (२४) हे उल्हासनगर मधील एका कंपनीत सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. ३ दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे ते उल्हासनगर ३ नंबर परिसरातील इंडियन बँकेत दुपारच्या सुमाराला कंपनीची ८० हजार रुपयाची रक्कम काढण्यासाठी आले होते. ते बँकेतून बाहेर आल्यानंतर एका आरोपीने रिक्षातून उतरताना हेमलाला यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर आरोपीने हातातील मोबाईल जमिनीवर आपटून त्यांच्यावर मोबाईल फोडल्याचा आरोप केला. तसेच माझा मोबाईल तुझ्यामुळे फुटला त्याला दुरूस्ती करून दे, असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. आरोपीने त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून सपना गार्डनकडे निर्जनस्थळी घेवून गेले. त्यानंतर त्याच्याकडील ८० हजार रुपयांची रक्कम काढून घेत हेमलालाला रिक्षातून उतरून दोघेही आरोपी फरार झाले.
हेमलाला यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरण करून ८० हजार रुपये लुटल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना काटेमानवली परिसरातून सापळा रुचून अटक केली. या २ आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.