ठाणे : १० कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून चेन्नई मधील दोन कंपनीतील संचालक टोळीने डोंबिवलीत एका डाॅक्टरसह तीन भागीदारांना १ कोटी ८ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या टोळी विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कृष्णन अय्यपन, बलराज अनिता, एस. कुमार, भास्कर, शेखर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी संचालकांची नावे आहेत.
१० कोटी रुपये कर्ज देण्याचा व्यवहार :डोंबिवली पूर्वे कडील एमआयडीसीत एम. डी. ठाकूर मेमोरिअल रुग्णालय आहे. या रुग्णालयांचे संचालक डाॅ. हर्षवर्धन दिलीप ठाकूर आणि त्यांच्या दोन भागीदार, अनिल राजाराम धमाले, हेमंत पांडुरंग देशमुख, डॉक्टरचे सल्लागार कर्ज मिळविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करीत होते. त्यावेळी तमीळनाडू राज्यातील चेन्नई शहरातील मे. नारीऑक्स होल्डींग, मे. क्रोना ग्रोथ कंपनीच्या संचालकांची त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर मे. नारीऑक्स होल्डींग प्रायव्हेट लीमिटेड कंपनीचे संचालक, आणि मे. क्रोना ग्रोथ कंपनीचे संचालक आरोपी कृष्णन अय्यपन, बलराज अनिता, एस. कुमार, भास्कर, शेखर यांनी त्यांना १० कोटी रुपये कर्ज देण्याचा व्यवहार ठरला होता.
कर्ज देण्याचे आमिष :त्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये तक्रारदार डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांना आरोपी कंपनीचे संचालकांनी १० कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र या कर्ज मंजुरीच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपी कंपनीच्या संचालकांनी डाॅ. ठाकूर यांना काही रक्कम भरणा करण्यास सांगितले. त्यानंतर डाॅ. ठाकूर यांनी टप्या टप्प्याने आरोपींच्या बँक खात्यात एकूण ८२ लाख ५० हजार रुपये जमा केले. मात्र, कर्ज मंजुरीसाठीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी रक्कम भरणा करुनही कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यातच दोन वर्ष होत आली तरी, कर्ज मिळत नसल्याचे पाहून डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांनी चेन्नईतील कर्ज देणेकरी कंपन्यांच्या संचालकांकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. सततच्या पाठपुराव्यानंतर आरोपी संचालकांनी डाॅ. हर्षवर्धन यांना ३० लाख ३० हजार रुपये परत केले. उर्वरित ५२ लाख २० हजाराची रक्कम परत करण्यासाठी तगादा लावूनही ती रक्कम आरोपींनी परत केलीच नाही.
आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल :शिवाय डाॅ. हर्षवर्धन यांच्यासह भागीदार हेमंत पांडुरंग देशमुख यांची या व्यवहारात ३६ लाख ९० हजार रुपये, तर अनिल राजाराम धमाले यांची १७ लाख ५० हजार रुपये आणि डाॅक्टरांचे सल्लागार यांचे दोन लाखाचे कर्ज मिळविणाच्या नादात लाखोंची रक्कम अडकून पडली आहे. तक्रारदारानी रक्कम परत मिळावी म्हणून विविध प्रकारे प्रयत्न करुनही आरोपी कंपनीच्या संचालकांनी त्यास दाद दिली नाही. अखेर आपली आणि भागीदारांची मे. क्रोना, मे. नारीऑक्स कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव याप्रकरणाचा तपास करीत आहेत.
हेही वाचा -Kurnool Murder Case: मित्राच्या गर्लफ्रेंडला तिचेच 'न्यूड व्हिडीओ' दाखवून करत होता 'ब्लॅकमेल'.. मित्रानेच काढला काटा