ठाणे- गारुड्यांच्या तावडीतून 2 कोब्रा नागांची सुटका करण्यात आली आहे. गारुडी टिटवाळा येथील गणपती मंदिरासमोर खेळ दाखवत होते. जागृत नागरिकांनी ही बाब वन विभागाला कळवली. वन अधिकारी घटनास्थळी पोहोचताच गारुड्यांनी टोपलीसह नाग सोडून पळ काढला. टिटवाळा पोलीस त्या फरार गारुड्यांचा शोध घेत आहेत.
गारुड्यांच्या तावडीतून दोन कोब्रा नागांची सुटका, गारुडी मात्र फरार - पोलीस
मुक्या प्राण्यांसह सापांचा खेळ दाखवणे कायद्याने गुन्हा असूनदेखील काही गारुडी शहरी भागात सापांचा खेळ दाखवण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. अशीच घटना ठाणे शहरात समोर आली आहे.
मुक्या प्राण्यांसह सापांचा खेळ दाखवणे कायद्याने गुन्हा असूनदेखील काही गारुडी शहरी भागात सापांचा खेळ दाखवण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यातच नागपंचमीच्या सणाला 20 दिवस शिल्लक असतानाच शहरात नागांना दूध पाजण्याच्या बहाण्याने गारुड्यांनी भाविकांकडून पैसे उकळण्यात धंदा थाटला आहे.
अशीच दोन गारुडी सोमवारी टिटवाळा परिसरातील प्रसिद्ध महागणपती मंदिरासमोर भाविकांना टोपलीतील नाग दाखवत दूध पाजण्याच्या बहाण्याने भाविकांकडून पैसे उकळत होते. ही गोष्ट वार संस्थेतील स्वप्निल कांबळे आणि निखिल कांबळे या दोघांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन या गारुड्यांना सापांचा खेळ दाखवून पैसे देण्यास मनाई केली. तसेच त्यांनी वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. काही वेळातच वन अधिकारी जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वन अधिकाऱ्यांना पाहताच दोघाही गारुड्यांनी टोपलीसह नाग टाकून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर या दोन्ही नागांना वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यांना जंगलात सोडणार असल्याचे सांगितले. तसेच गारुड्यांविरोधात वन्यप्राणी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.