ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेचे दोन सफाई कर्मचाऱ्यांना महावितरणच्या ट्रान्सफार्मर जवळ सफाई काम करत असतांना अचानक विजेचा शॉक लागला. त्यात ते गंभीररित्या भाजल्या गेल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटने बद्दल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. लखन करोतिया (वय - २२) व सनत्रेस करोतिया (वय - २३) असे जखमी सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी -
उल्हासनगर मधील पॅनल क्रमांक नऊमध्ये लखन करोतिया व सनत्रेस करोतिया हे सफाई कर्मचारी सफाईचे सकाळच्या सुमारास साफसफाईचे काम करत होते. यावेळी जवळच असलेल्या महावितरण ट्रान्सफार्मरच्या विद्युत वाहिनीच्या ते संपर्कात आल्याने त्यांना जबर विजेचा धक्का बसल्याने दोघेही गंभीररित्या भाजले गेले आहेत. त्यांना उपचारासाठी उल्हासनगर मधील मीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले आहे. या घटनेचा निषेध करत कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
नगरसेविकेमुळे घटना घडल्याचा आरोप -
नगरसेविका दीपा पंजाबी यांनी दोन कर्मचाऱ्यांना जबरदस्तिने महावितरणच्या विजेच्या ट्रान्सफार्मरमध्ये काम करण्यास लावल्याने हा प्रकार घडला असल्याच्या आरोप भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व जखमी झालेल्या कर्मच्याऱ्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च महानगरपालिका प्रशासनाने करावा अशीही मागणी कामगार नेते साठे यांनी केली आहे.