ठाणे- गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी कल्याणमध्ये आलेल्या 2 आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. शाहरुख सय्यद (२२) आणि आकाश शिंदे (२३)अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यांच्याकडून 2 गावठी बनावटीची पिस्तुले, 4 मोबाईल जप्त केले आहेत.
या दुकलीने पिस्तुले कुणाला विकण्यासाठी आणली होती, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याणमध्ये गावठी पिस्तुलांसह 2 तस्कर जेरबंद हेही वाचा - ठाण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या पोलिसांवरच कारवाई
पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आणि पोलीस शिपाई दीपक सानप यांना 2 जण पिस्तुल विकण्यासाठी कल्याणामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कल्याण पश्चिमेकडे मुरबाड रोडला सापळा रचला. दोघे तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान शाहरुख सय्यद आणि आकाश शिंदे या दोघांकडून 2 गावठी पिस्तुल जप्त करण्यात आली.
तस्कर शाहरुख हा कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर येथे राहणारा आहे. त्याच्या विरोधात याआधी ठाणे नगर, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर तस्कर आकाश शिंदे हा आधारवाडी चौकातील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारा आहे. त्याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
हेही वाचा - ठाण्यात अपहरण करून लुबाडणाऱ्या आरोपींना अटक