मीरा-भाईंदर (ठाणे)- शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना आमदार गीता जैन यांच्या कार्यालयासमोर असलेल्या एसके मेडिकलमध्ये घडली. गुरुवारी मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास मेडिकलमध्ये एक व्यक्ती शटर तोडून आता येतो आणि रोख रक्कम घेऊन पळ काढतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आमदार गीता जैन यांच्या कार्यालयासमोर एस.के मेडिकल असून या मेडिकलमध्ये २४ मे रोजी चोरी झाली होती आणि पुन्हा ९ तारखेला मध्यरात्री ४ च्या सुमारास चोरी झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच दुकानात साडे तीन महिन्यात दोन वेळा चोरी झाली आणि तेही आमदार गीता जैन यांच्या कार्यालयासमोरच, यामुळे नेमके पोलीस काय करत आहेत, असा प्रश्न व्यापारी वर्ग विचारत आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी ज्या वेळेस चोरी झाली होती, त्यावेळेसही तक्रार दाखल केली होती. परंतु, अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आता पुन्हा त्याच दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.