भिवंडी(ठाणे)-भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटूंब राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ४२ जण जखमी झाले होते. यावेळी शासनाने दाखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र,पालिका प्रशासनाने कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून इमारतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या राज्यात व देशात कोरोनाची महामारी आजाराची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु असल्याने या धोकादायक इमारतीत राहणारी कुटुंबे हवालदिल झाले आहेत
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढत असून सुमारे ७८२ धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणामध्ये उघड झाले आहे. यापैकी २१० इमारती अतिधोकादायक आहेत. यातील ४३ इमारती तोडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे शहर विकास विभागाचे प्रमुख राजू वर्लीकर यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे.
महापालिका केवळ धोकादायक इमारती रिकाम्या करा असे नोटीस देवून त्यांचे पुनर्वसन न करता आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.मात्र, कोरोनाच्या या आजारात ही कुटुंबे कुठे जाणार आणि कुठे राहणार हाच खरा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आपला जीव मुठीत धरून ते एक एक दिवस काढत आहे. भिवंडी शहरामध्ये यंत्रमाग उद्योग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहत असून दिवसभर काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरून उरलेल्या पैशामध्ये कर्ज अथवा दागिने गहाण ठेवून एखादे घर घेवून राहत आहेत. त्यामुळे नवीन घर घेणे शक्ये नसल्याने जुनीच घरे कामगाराला नाईलाजाने घ्यावी लागत आहेत. अशा प्रकारे धोकादायक इमारतीमध्ये कामगारांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात राहत आहेत.
भिवंडी - निजामपूर शहर महानगरपालिकेच्या एकूण पाच प्रभाग समित्या आहेत. त्यामध्ये प्रभाग समिती क्र १ मध्ये ३६ , प्रभाग समिती क्र २ मध्ये १५९, प्रभाग समिती क्र ३ मध्ये २०८ ,प्रभाग समिती क्र ४ मध्ये २७८, प्रभाग समिती क्र ५ मध्ये २२१ अशा एकूण ७८२ धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरिक राहत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका फक्त अति धोकादायक आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा बजावून आपले काम दाखवत आहे. मात्र, सध्याच्या ७८२ इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करून आपले कर्तव्य का पार पडत नाही? असा सवाल येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या राज्यात व देशात कोरोनाची महामारी आजाराची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु असल्याने या धोकादायक इमारतीत राहणारी कुटुंबे हवालदिल झाले आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेवून धोकादायक इमारतीचा धोका कसा टाळता येईल, त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.