विरार (ठाणे) - निर्सगाचे देणे लाभलेल्या वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर अभयारण्याला मागील दोन दिवसांपासून वणवे लागले आहेत. या अभयारण्यात अनेक प्रजातींच्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा अधिवास आहे. मात्र, सतत लावल्या जाणाऱ्या आगीमुळे येथील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
निसर्ग व प्राणी पक्षी यांच्या अधीवासाला धोका -
वसई पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्याचे ८ हजार ५७० हेक्टर वनक्षेत्र आहे. धबधबे पाणवठा, वृक्ष, पक्षी आणि प्राण्यांचा येथे मोठया प्रमाणावर अधिवास आहे. मात्र, येथे अधून मधून आगी लागण्याच्या घटनेमुळे निसर्ग व प्राणी पक्षी यांच्या अधीवासाला धोका पोहचत आहेत. गेल्या दोन दिवसापासून अभयारण्याच्या पूर्वेकडील माजिवली, देपीवली, मस्किना बाजूने तर पश्चिमेकडे व उत्तरेकडेही अनेक छोटे मोठे वणवे लागले आहेत. या अभयारण्यात नेहमी वणवे लागतात. मात्र, नेमकी आग कुठे लागली आहे, याचा शोध घेत वन विभाग त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करते. मात्र, तोवर आग वाऱ्यासारखी पसरत जाते आणि ती आटोक्यात आणण्यासाठी वेळ जातो.